माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारीची कारवाई (File Photo : CBI)
रायपूर : महादेव बेटिंग अॅप हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता या प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील 60 ठिकाणी छापे टाकले. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव आणि 5 आयपीएस अधिकारी व 2 कॉन्स्टेबलच्या घरावर सीबीआयने छापे टाकले.
सीबीआयची 10 हून अधिक पथके रायपूरहून निघाली. एक पथक रायपूरमधील बघेल यांच्या घरी पोहोचले. यानंतर, उर्वरित पथके बघेल यांचे पदुम नगर येथील घर, आमदार देवेंद्र यादव यांचा बंगला, आयपीएस अभिषेक पल्लव यांचा बंगला आणि कॉन्स्टेबल नकुल आणि सहदेव यांचे नेहरू नगर येथील घर गाठले. सीबीआयची ही संपूर्ण कारवाई महादेव बेटिंग अॅपच्या ऑपरेशन आणि त्याच्याशी संबंधित पैशांच्या व्यवहारांशी संबंधित आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या भूपेश बघेल यांच्या घरावर यापूर्वी ईडीनेही छापा टाकून कारवाई केली होती. कथित मद्य घोटाळा, कोळसा कर आणि महादेव बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ईडीच्या पथकाने छत्तीसगडमधील 14 ठिकाणी छापे टाकले होते. ज्यामध्ये भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता. आता पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणेचा भाग असलेल्या सीबीआयने छापेमारीची कारवाई केली आहे.
ईडीची तपासणी आणि पोलिस बंदोबस्त
चार वाहनांमधून आलेल्या ईडीच्या पथकाने घरातील कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी केली. छाप्यादरम्यान घराबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासोबतच भिलाईतील नेहरूनगर येथील मनोज राजपूत, चारोडा येथील अभिषेक ठाकूर आणि संदीप सिंग, दुर्ग येथील कमल अग्रवाल यांच्या किशोर राईस मिल, सुनील अग्रवाल यांच्या सहेली ज्वेलर्स आणि बिल्डर अजय चौहान यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली.