गुरुवारी दुपारी 1.20 च्या सुमारास राम लल्लाच्या मुर्तीचं गर्भगृहात आगमन झालं. यावेळी वेदमंत्रांच्या गजरानं वातावरण मंगलमय झालं होतं. गुरुवारी मूर्तीच्या जलाधिवासापर्यंतचं काम पूर्ण करण्यात आलं. आता 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार असून प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तांना दर्शन घेता येणार आहे. रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी एकूण चार तासांपेक्षा अधिकचा वेळ लागणार आहे. भगवान श्रीरामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधींसह पीठावर ठेवण्यात आली आहे. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संतही उपस्थित होते. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे.