रामदास आठवले यांचे जातिनिहाय जनगणनेवर भाष्य (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: आज केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानबाबत काही मोठा निर्णय होतो का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशभरात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाष्य केले. रामदास आठवले म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा निर्णय ऐतिहासिक असा निर्णय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात शेड्यूल जनगणना होत होती. आता पहिल्यांदाच ओबीसी जनगणना होणार आहे.”
“कॉँग्रेसने अशा प्रकारची कधीही जनगणना केली नाहीये. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी जातीच्या आधारावर जनगणना करू असा निर्णय घेणार असं सांगितलं होतं पण ते केलं नाही. राहुल गांधी आधीपासून ओबीसी जनगणना झाली पाहिजे अशी मागणी करत होते. मी सुद्धा जातीच्या आधारावर जनगणना करा ही मागणी अनेकदा लोकसभेत केली होती”, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
“ओबीसी बरोबर सर्व जातींची जनगणना होणे आवश्यक आहे. किती लोकं शेतकरी आहेत, कोण काय करत आहे, हे सर्व जनगणनेमध्ये आलं पाहिजे. अत्यंत चांगला निर्णय असा मोदी सरकारने घेतला आहे. याचे श्रेय कोणीही घ्यायची गरज नाही. हे सर्व श्रेय मोदी सरकारचे आहे. विरोधकांनी याचं क्रेडिट घेऊ नये. जातिनिहाय जनगणना केल्यामुळे ओबीसी किती आहेत, लिंगायत किती आहेत, प्रत्येक जातीमध्ये कोण किती आहे हे कळणार आहे”, असे आठवले म्हणाले.
देशात जातिनिहाय जनगणना करणार
भारतात दहा वर्षांनी जातिनिहाय जनगणना केली जाते. त्यानुसार 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळेस करोना संसर्ग असल्याने जातिनिहाय जनगणना करण्यात आली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जातीच्या गणणेचा जातिनिहाय जनगणणेत समावेश केला जाईल असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
Big Breaking: देशात जातिनिहाय जनगणना करणार; नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय
मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा घेतलेला हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा निर्णय समजला जात आहे. 1947 नंतर देशात जातिनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. कॉँग्रेसने जातिनिहाय जगणणेऐवजी जातिनिहाय सर्वेक्षण केले, अशी टीका मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॉँग्रेसवर केली आहे. आजच्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा निनरया होईल अशी शक्यता होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याबाबत काहीतरी निर्णय होईल असे वाटत होते. मात्र केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.