संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसरा दिवशीही राडा; विरोधकांकडून 'व्होट चोर गद्दी छोड'ची नारेबाजी
तत्पूर्वी, संसद संकुलातील मकर द्वारसमोर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता निषेध केला. त्यांनी एसआयआरवर तात्काळ बंदी घालण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला.
संचार साथी अॅपवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला, ज्यामुळे सरकारचीही चांगलीच कोंडी झाली. यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हे अॅप अनिवार्य नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते अॅप हटवू शकता, अशी घोषणा केली. (Parliament Winter Session News)
केंद्र सरकारला दूरसंचार सायबर सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या क्रियाकलापांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचा अहवाल देण्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल किंवा इतर माध्यमे तयार करण्याचा अधिकार आहे. म्हणूनच, दूरसंचार विभागाने संचार साथी अॅप लाँच केले आहे, जे युजर्सला संशयित आयएमईआय-संबंधित गैरवापराची तक्रार करण्यास आणि मोबाइल डिव्हाइसमध्ये वापरल्या जाणाऱ्या आयएमईआयची सत्यता पडताळण्यास मदत करते.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, डुप्लिकेट किंवा बनावट आयएमईआय असलेले मोबाइल हँडसेट टेलिकॉम सायबर सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. म्हणूनच, केंद्र सरकार भारतात वापरण्यासाठी उत्पादित किंवा आयात केलेल्या मोबाइल हँडसेटच्या प्रत्येक उत्पादक आणि आयातदाराला ९० दिवसांच्या आत, भारतात वापरण्यासाठी उत्पादित किंवा आयात केलेल्या सर्व मोबाइल हँडसेटवर संचार साथी मोबाइल अॅप्लिकेशन प्री-इंस्टॉल केलेले आहे याची खात्री करण्याचे निर्देश देते.
दरम्यान, संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१ डिसेंबर) विरोधकांनी एसआयआरच्या मुद्द्यावरून आणि मतचोरीच्या आरोपांवरून दोन्ही सभागृहांत गोंधळ घातला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सरकारला एसआयआर आणि निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यांनी विरोधकांनी या चर्चेला कोणतीही कालमर्यादा लादू नये, असे आवाहन केले.
किरेन रिजिजू म्हणाले की, चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून “निवडणूक सुधारणा” किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात समाविष्ट केला जाऊ शकतो. हा प्रस्ताव सरकार मान्य करण्याची शक्यता असून व्यवसाय सल्लागार समितीत यावर भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
लोकसभेत बोलताना भाजप खासदार शशांक मणी त्रिपाठी यांनी विरोधकांवर तीव्र हल्ला चढवला. त्रिपाठी म्हणाले की, विरोधक जाणूनबुजून गोंधळ निर्माण करत असून राजकीय फायद्यासाठी संवैधानिक संस्थांना लक्ष्य करत आहेत. ही घोषणा देशाविरुद्ध आहेत. बिहारच्या जनतेने एसआयआर मुद्द्यावर स्पष्ट निर्णय दिला आहे, तरीही विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”






