पाकिस्तान (Pakistan) देशाची निर्मिती 1947 मध्ये करण्यात आली. मात्र आजही बहुसंख्य भारतीय ही गोष्ट स्वीकारू शकलेले नाहीत. पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक स्थिती गंभीर आहे. तिथला महागाई दर 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. एका वर्षात पाकिस्तानचा रुपया 33 टक्क्यांनी घसरला आहे. पेट्रोल पंपावर इंधन नाही. वीजेची समस्या सुरु झाली आहे. अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर लेखक चेतन भगत (Chetan Bhagat Article) यांनी संडे टाईम्समध्ये रविवारी एक लेख लिहिला. या लेखाचं शीर्षक होतं ‘इज इट टाइम फॉर पाकिस्तान टू रिटर्न टू द मदरलँड ? (पाकिस्तानने मातृभूमीकडे परत येण्याची वेळ आली आहे का?
चेतन भगत यांनी लिहिलेल्या या लेखाची सध्या चर्चा सुरु आहे. त्यांनी लेखात लिहिलं की, एकिकडे पाकिस्तान उध्वस्त झाला आहे. दुसरीकडे भारत (India) जगासाठी ग्रोथ इंजिन असल्याचं सिद्ध होत आहे. अशा वेळी बुलेट ट्रेनची तुलना खराब ऑटोसोबत करता येणार नाही. पण भारताने या परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा. ही एकत्र यायची योग्य वेळ आहे. हे लोकांना अव्यावहारिक वाटू शकतं. लोक माझ्यावर हसतील. पण एकत्र येणं हा चांगला विचार आहे. पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीरच्या बाबतीत एक भूमिका घेऊन चालतोय त्याप्रमाणेच भारतानेही पाकिस्तानचा भूभाग परत एकत्र करुन घ्यायला हवा. पाकिस्तानचा भूभाग मुलत: भारताचा भाग नव्हता का ? फक्त काही राजकीय नेत्यांच्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे सत्त बदलू शकत नाही.
चेतन भगत पुढे लिहितात की, पाकिस्तानच्या निर्मितीमागे काय कारण होतं याचा विचार करा. मुस्लिम लोकांसाठी सुरक्षित जागा ? ती खरंच सुरक्षित जागा आहे का ? या देशातला कोणताही पंतप्रधान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. हा देश दहशतवादाची जननी बनला आहे. सैन्याच्या हुकुमशाहीने लोकशाहीवर घाला घातला आहे. वारंवार भारतासोबत लढून त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला बुडवलं. ही जगातली सगळ्यात असुरक्षित जागा आहे.
एकीकृत भारत
चेतन भगत सांगतो की, भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. ते सपशेल चुकीचं ठरलं आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात मुस्लिम लोकसंख्या अनेक पटींनी वाढली आहे. ज्या समस्या आहेत त्याच्यामागे राजकारण आहे. पण खरंतर भारताच्या विकासगाथेमध्ये इतर भारतीयांप्रमाणे मुस्लिमांचाही वाटा आहे. यावेळी पाकिस्तानाच्या स्थापनेच्या सिद्धांतापेक्षा एकीकृत भारताविषयी बोलणं पाकिस्तानच्याही हिताचं आहे. पाकिस्तान आपल्या निर्मितीपासून आयडेंटीटी क्रायसिसमध्ये अडकलाय. वारंवार अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते भारतासोबत तणाव वाढवतात.
भविष्य काय ?
सध्याच्या परिस्थितीत भारताने नातेसंबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या विलिनीकरणासाठी आपण तयार असल्याचं सांगायला हवं. एकिकरण होणं अशक्य आहे. जरी झालं तरी त्याला खूप वेळ लागेल. मात्र यातून भारत पाकिस्तानमध्ये एक प्रो इंडिया पार्टी तयार करु शकतो.