File Photo : Champai Soren
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren) यांना खुर्ची सोडण्याचे फर्मान जारी झाल्याचा दावा भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी कल्पना सोरेन यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी चंपई सोरेन यांना खुर्ची सोडण्याचे आदेश तुरुंगातूनच सोरेन यांनी जारी केल्याचा दावा दुबे यांनी केला.
हेमंत सोरेन तुरुंगात जाताच त्यांची पत्नी कल्पना यांनी सूत्रे हाती घेतली असून, त्या विरोधकांवर कडाडून हल्लाबोलही करत आहेत. इंडिया आघाडीच्या रॅलीत सहभागी झाल्यानंतर आता 21 एप्रिलला सोरेन यांच्या अटकेविरोधात रांचीमध्ये उलगलान महारॅली काढणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन हे कोणत्याही सरकारी किंवा पक्षाच्या कार्यक्रमात दिसत नाहीत. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कल्पना सोरेन यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आदेश जारी केला आहे. सीता सोरेन जी, लोबिन जी आणि चमरा लिंडा जी यांनी ठरवले आहे… खेला होबे ?
सीता सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर उलथापालथ
हेमंत सोरेन यांची मेहुणी सीता सोरेन यांनी झामुमो सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना दुमका मतदारसंघातूनही तिकीट दिले आहे. या जागेवरून हेमंत सोरेन निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, झामुमोने येथून नलिन सोरेन यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, झामुमोचे आमदार लोबिन हेमब्रम यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.