नवी दिल्ली : एनएसईच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना ईडीने (Enforcement Directorate) आज अटक केली. राष्ट्रीय शेअर बाजार कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरील हेरगिरीच्या आरोपांखाली ईडीने ही कारवाई केली आहे. यावेळी, रामकृष्ण यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचाही (Scam) आरोप करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने चित्रा रामकृष्ण यांच्यासोबतच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey), रवी नारायण (Ravi Narayan) यांच्याविरोधातही मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) गुन्हा दाखल केलेला आहे. आर्थिक पत्रकारिता क्षेत्रातील एक ज्येष्ठ पत्रकारदेखील ईडीच्या रडारवर आहे.
एनएसईचे काही कर्मचारी गोपनीय माहिती बाहेर देत होते, असा संशय चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांना होता. त्यामुळे त्यांनी २००९ ते २०१७ या सालापर्यंत संजय पांडे यांच्याशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरशी संबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती, असा दावा करण्यात आला आहे.