यशवंत बँक प्रकरणी ईडीची कारवाई (फोटो- सोशल मीडिया)
यशवंत बँक अपहार प्रकरणात मोठी कारवाई
तब्बल 112 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण
एकास अटक तर दुसऱ्यास पोलिस कोठडी
कराड: फलटण (जि. सातारा) येथील यशवंत सहकारी बँकेत झालेल्या तब्बल ११२ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी तपासाचा फास अधिक आवळत सातारा आर्थिक गुन्हे शाखेने राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी (रा. पुणे) याला अटक केली आहे. कराड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सोमवार, दि. २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र झाली असून, मंगळवार, दि. २३ रोजी पहाटेपासून फलटण व कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापासत्रात सुमारे १६ तासांहून अधिक काळ कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी या अपहारप्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते.
मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या अपहारप्रकरणी शेखर चरेगावकर, शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, त्यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल कुलकर्णी यांच्यासह इतर सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बँकेच्या ठेवीदारांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत संपूर्ण अपहारप्रकरणाची ईडीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच ईडीने फलटण, कराड व परिसरात छापासत्र राबवून बँकेच्या शाखांमध्ये जाऊन चौकशी करत आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.
या छाप्यादरम्यान, शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह दोन जणांची प्राथमिक चौकशी करून त्यांना आवश्यक माहिती घेऊन सोडण्यात आले, तर पाच जणांना मुंबई येथे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने शौनक उर्फ विठ्ठल कुलकर्णी याच्यासह अन्य आठ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतरच सातारा आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री शौनक कुलकर्णीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. बुधवारी, दि. २४ रोजी त्याला कराड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यशवंत बँक अपहारप्रकरणी ईडीकडून कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






