'महिला आधी शिक्षणच घेत नव्हत्या, तुम्हाला काय माहितीये!'; बिहारचे CM नितीश कुमार भर सभागृहात असं का म्हणाले?
बिहारच्या विधान परिषदेत शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी महिला सदस्यांवर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. पूर्वी महिला शिक्षित नव्हत्या. तुम्हाला शिक्षणाबद्दल काहीच माहिती नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून महिला दिनाच्या आधी असं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.
Patna, Bihar: During the Bihar Legislative Assembly session, in response to RJD leader Urmila Thakur’s question, CM Nitish Kumar says, “We have done work for women…You belong to a party that has never done anything for women…” pic.twitter.com/ryJLEXUG3D
— IANS (@ians_india) March 7, 2025
नितीश कुमार यांनी केवळ विरोधी महिला नेत्यांनाचं फटकारलं नाही तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यावरही टीका केली. लालू प्रसाद यांच्या राजवटीत महिला शिक्षणाबाबत कोणतंही काम झालं नाही. महिला शिक्षणाबाबतची सर्व कामं त्यांच्या सरकारच्या काळात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
शुक्रवारी (७ मार्च) मुख्यमंत्री नितीश कुमार सर्वप्रथम विधानसभेत पोहोचले, ते पोहोचताच विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभागृहातील गोंधळाला सामोरं जाताना नितीश कुमार भडकले आणि येथून थेट विधान परिषदेत गेले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याने शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्न विचारला. ज्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच भडकले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षाच्या ३ महिला विधानपरिषद सदस्यांना फटकारले आणि म्हणाले, “तुम्ही लोक गप्प बसा…तुम्हा लोकांना काहीच माहिती नाही…या लोकांनी तुम्हाला सदस्य बनवलं म्हणूनच तुम्ही बोलू शकता.” महिला आणि महिला शिक्षणासाठी आरजेडी सरकारने काय केले? मागील सरकारने महिलांसाठी काहीही केले नाही. महिला पूर्वी कुठे शिकत होत्या? प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांनी शिक्षण घेतलं नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
नितीश कुमार यांनी राबडी देवींकडे बोट दाखवत म्हणाले, ” त्यांच्या पतीवर आरोप झाले त्यानंतर त्यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री बनवलं.” त्यानंतर, त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी काय केलं आहे? महिलांसाठीचे सर्व काम आमच्या सरकारने केले आहे, असा टोला लगावला.