काँग्रेसची 9वी यादी जाहीर; सीपी जोशींना भिलवाडामधून तिकीट, राजस्थानमधील उमेदवार बदलला!

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

    लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (Congress) आणखी एक यादी जाहीर केली आहे. काँग्रेसची ही नववी यादी आहे. या यादीत कर्नाटक आणि राजस्थानच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने राजस्थानमधील एका जागेवर आपला उमेदवार बदलून त्याला दुसऱ्या जागेवर हलवले. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

    तिकीट कोणाला कुठून मिळालं?

    काँग्रेसच्या यादीत पाच उमेदवारांची नावे आहेत. ई.थुकाराम यांना कर्नाटक राज्यातील बेल्लारी एसटीसाठी राखीव लोकसभा जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. चामराजनगर राखीव जागेसाठी सुनील बोस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा रमैया यांना कर्नाटकातील चिक्कबल्लापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानमधील राजसमंद येथून घोषित उमेदवार सुदर्शन रावत यांची बदली करण्यात आली आहे. येथे भिलवाडा येथून यापूर्वी जाहीर केलेले उमेदवार डॉ. दामोदर गुर्जर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता ताकदवान नेते डॉ. सीपी जोशी यांना भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे.