“ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना आमचं सरकार…”, काँग्रेस उमेदवाराची अजब घोषणा

मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

    मध्यप्रदेश : लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरु आहे, देशभरामध्ये निवडणूकीचे वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींच्या सभा देखील वाढल्या आहेत. घोषणा अन् आश्वासनांची तर रीघ लागली आहे. मात्र कॉंग्रेसच्या एका नेत्याने प्रचारसभेमध्ये अजब घोषणा केली आहे. ज्यांना दोन बायका असतील त्यांना दोन लाख रुपये देऊ अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

    दोन बायका असतील त्यांना २ लाख रुपये

    लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. स्वयंपाकाचा गॅस, बस प्रवासासाठी सबसिडी दिली जाणार आहे. या योजनेचा प्रचार करत असताना कांतीलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. भूरिया म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने न्याय पत्रात (निवडणुकीचा जाहीरनामा) महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. याअंतर्गत आमचं सरकार आलं तर गरीब कुटुंबातील महिलांना आम्ही दर वर्षी १ लाख रुपये देणार आहोत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या दोन बायका (पत्नी) असतील त्यांना २ लाख रुपये मिळतील. कांतीलाल भूरिया यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

    भाजपकडून तक्रार तर कॉंग्रेसकडून समर्थन

    विरोधकांनी कांतीलाल भूरिया यांच्या या वादग्रस्त विधानावरुन कॉंग्रेसला घेरले. भाजपने टीकेची झोड उठवत जोरदार टीका देखील केली आहे. भुरिया यांच्या वक्तव्यावरुन मध्यप्रदेशचे राजकारण रंगले आहे. भाजपने कांतीलाल भूरिया यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र कॉंग्रेसकडून भूरिया यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला जात आहे. या प्रचारसभेवेळी मंचावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारीदेखील उपस्थित होते. पटवारी म्हणाले, भूरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे. दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे. महालक्ष्मी योजनेनुसार काँग्रेसने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख महिलांना दर महिन्याला ८,५०० रुपये अर्थसहाय्य केलं जाईल.