फोटो सौजन्य - सौशल मीडिया
National Overseas Scholarship:परदेशात पदवी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.यंदा भारत सरकार पूर्णपणे अर्थसहाय्यित (Fully-funded) शिष्यवृत्तीवर विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप (NOS) ची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी २ जूनपर्यंत पोर्टल खुले राहणार असून इच्छुकांना या कालावधीत अर्ज करावा. तसेच अर्जातील चुका सुधारण्यासाठी ७ जूनपर्यंत करेक्शन विंडो खुली असेल.
NOS ही एक सरकारी योजना आहे, ज्याद्वारे समाजातील उपेक्षित घटकांमधील विद्यांर्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थिक मदत दिली जाते. यामध्ये अनुसूचित जाती (SC), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर या प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. या योजनेद्वारे परदेशात पदव्युत्तर (Masters) आणि पीएचडी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे अर्थसहाय्य केले जाते.
विद्यार्थ्यांना सर्वात आधी NOS च्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वैयक्तीक, शैक्षणिक आणि आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा लागेल. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एकदा नोंदणी झाल्यानंतर पुन्हा त्यात बदल करता येणार नाही. तसेच अर्जामध्ये चुका अढळल्यास तो फेटाळला जाईल. २ जून रोजी मुख्य अर्ज प्रक्रिया बंद झाल्यानंतर ४ जून ते ७ जून याकालावधीत दुरुस्तीसाठी ४ दिवसांची मुदत दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रे: अर्ज करताना उमेद्वाराला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागते. ज्यांमध्ये ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका, कुटुंबातील सदस्याचे उत्पन्न आणि परदेशी विद्यापीठाचे प्रवेशपत्र (Admission Offer Letter) यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
या योजनेचा उद्देश अल्पप्रतिनिधित्व असलेल्या गटातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करणे हा आहे.






