”इकडे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे…”, अंबानींच्या ‘प्री-वेडिंग’वरुन राहुल गांधींचा निशाणा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री – वेडिंग कार्यक्रमाची चर्चा रंगलेली असून यावर आता कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

    दिल्ली – सध्या देशभरामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री – वेडिंग कार्यक्रमाची चर्चा रंगलेली दिसत आहेत. अनेक परदेशी पाहुण्यांसह देशातील राजकारणी, खेळाडू व बॉलीवूड मधील मंडळींना गुजरातमध्ये होणाऱ्या अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावर आता कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वेळी बोलत होते.

    गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरु आहे. यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, “जगभरातले दिग्गज लोक अंबानींच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. सध्या मी जे बोलतोय ते कुणीही दाखवणार नाही. टीव्हीवर फक्त अंबानी यांच्या मुलाचा शाही विवाह दाखवला जातोय. तिथे लग्नाची धुमधाम सुरु आहे. जगभरातील लोक येत आहेत.. सेल्फी घेतल्या जात आहेत.. आणि तु्म्ही इथे उपाशी मरत आहात.” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

    त्याचबरोबर ग्वाल्हेर येथे राहुल गांधींनी पु्न्हा एकदा जातनिहाय जनगणनेची मागणी केली. ते म्हणाले की, “देशात साधारण ५० टक्के ओबीसी, १५ टक्के दलित आणि ८ टक्के आदिवासी वर्गातील लोक आहेत. म्हणजे 73 टक्के लोक. देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांमधील मॅनेजमेंटमध्ये एकही ओबीसी, दलित किंवा आदिवासी तुम्हाला दिसणार नाही. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली तर मोदी म्हणतात- देशात केवळ दोन जाती आहेत.. गरीब आणि श्रीमंत. देशातल्या ७३ टक्के लोकांना संधी मिळावी, असं त्यांना वाटतच नाही.” असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.