काँग्रेस नेते राहुल गांधी येणार मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांची घेणार भेट
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. राहुल गांधी हे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून, दसऱ्या आधीच पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, आपल्या दौऱ्यात कल्याणमधील साडी प्रकरणातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मानही केला जाणार असल्याचे समजते.
कल्याणमधील काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना कोणी तरी पाठविली होती, ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली. त्यामुळे, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांना पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसवली होती. या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळाले. भाजप पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात साडी नेसवून अवमान केल्यानंतर मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
हेदेखील वाचा : बहीण-भावाच्या नात्यावर भाजप नेत्याची वादग्रस्त टीका; म्हणाले, “विरोधी पक्षनेते बहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस..”
दरम्यान, मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागात निषेध मोर्चा काढणार आहेत. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. संजय राऊत यांनी हा मोर्चा कोणत्या शहरात किंवा जिल्ह्यात काढणार हे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50000 रुपये भरपाई द्यावी
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप नेतृत्वाखालील राज्य सरकारने पीएम केअर्स फंडातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५०,००० रुपये भरपाई द्यावी आणि त्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत मागावी
सध्या दिल्लीत असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत मागावी. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योगपती तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचीही मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.