नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियंका गांधीही (Priyanka Gandhi) त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रियंका गांधी लखनौ दौऱ्याहून माघारी परतल्या असून अद्याप त्यांची कोविड चाचणी करण्यात आलेली नाही.
काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये सोनिया गांधी यांनी अनेक नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यापैकी काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधींनी स्वतःला आयसोलेट केले आहे. तसेच, संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचे आवाहनेही केले आहे. गेल्या काही दिवसांत प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्यासोबत होत्या. त्यामुळे सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच, त्यांनी आपला लखनौ दौरा रद्द केला असून त्या दिल्लीला परतल्या आहेत.