कॉंग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रयागराज : देशभरामध्ये सध्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची चर्चा आहे. 144 वर्षांतून भरणाऱ्या या महाकुंभमेळ्याबाबत जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात असून या परंपरेबद्दल सर्वांनी कुतूहल व्यक्त केले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रेटी, राजकारणी आणि अभिनेते सहभाग होत आहेत. उत्तर प्रदेशमधील या महाकुंभमेळ्यामध्ये आता काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. दोघे बहीण भाऊ हे संगमामध्ये स्नान करुन साधूंचे आशिर्वाद घेणार आहेत.
प्रयागराजमध्ये 144 वर्षांनंतर होणारा महाकुंभमेळा भरला आहे. यामध्ये राजकीय नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे महाकुंभाला जाणार आहेत. ते दोघे संगमात स्नान करणार असून संत आणि ऋषींचे आशीर्वाद घेणार आहेत. प्रयागराजच्या काँग्रेस सेवा दलाच्या छावणीत राहुल गांधी व प्रियांका गांधी राहणार आहेत. याबद्दल सेवा दलाशी संबंधित एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सेवा दलाशी संबंधित एका अधिकाऱ्याने राहुल गांधी व प्रियांका गांधी हे महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र याबाबत अद्याप काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मात्र महाकुंभमेळ्यामध्ये नक्कीच सहभागी होणार आहेत. उद्या (दि.18) शनिवारी महाकुंभ मेळ्याच्या संगमावर पोहचणार आहेत. तसेच 29 जानेवारी रोजी असणाऱ्या मौनी अमावस्येच्या तयारीचा आढावा घेणार आहे. मौनी अमावस्येला 8-10 कोटी भाविक स्नान करण्यासाठी येतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह शनिवारी प्रयागराजमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
आज (दि.17) महाकुंभाचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत एकूण 7 कोटी लोकांनी संगममध्ये स्नान केले आहे. लखनौमध्ये, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की सरकारचा सर्व डेटा बनावट आहे. काही गाड्या रिकाम्या जात आहेत. भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी दिल्लीत प्रत्युत्तर देत म्हटले की त्यांच्या विधानाला कोणताही आधार नाही. महाकुंभ लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे हे जग पाहत आहे. लोक केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही येत आहेत. सरकारला अखिलेशच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे चोख प्रत्युत्तर भाजप खासदारांनी दिले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत अपडेट घ्या एका क्लिकवर
कोट्यवधी लोक एकत्रितपणे जमणाऱ्या या महाकुंभाचे उल्लेखनीय असे यशस्वी आयोजन उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून करण्यात आले आहे. या सर्व नियोजनासाठी सर्वत्र त्यांच्या सरकारचे कौतुक केले जात आहेत. तर उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे यश न मिळाल्यामुळे अखिलेश यादव यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राम मंदिर तसेच २०२५ च्या महाकुंभाचा फायदा घेईल. म्हणूनच अखिलेश यादव सतत मेळा परिसरातील गैरव्यवस्थापन आणि सरकारी आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या कुंभमेळ्यात ४० कोटी लोक सहभागी होतील असा सरकारचा दावा आहे. पहिल्या ५ दिवसातील भाविकांची संख्या पाहता, ही संख्या आणखी वाढू शकते असे दिसते. कारण जगातील सर्वात मोठ्या हिंदू धार्मिक मेळाव्यात, केवळ देशातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक संगमात स्नान करण्यासाठी तसेच हिंदू धर्म समजून घेण्यासाठी येत आहेत.