नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) वेग वाढला आहे. या चक्रीवादळाची भीषणता पाहून हवामान खात्याने कच्छ- सौराष्ट्रमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून चक्रीवादळ आक्रमक होण्याची शक्यता असून, 15 जून रोजी मांडवी आणि कराचीदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गंभीर झाले असून, गुरुवारी द्वारकाधीश मंदिर बंद राहणार आहे.
दरम्यान मान्सूनपूर्वीच सौराष्ट्रमधील 17 झालेल्या पावसाने धुमाकूळ घातला. यात अनेक घरांची पडझड झाली असून मासेमारांच्या वसाहतीची नासधूसही झाली आहे. पश्चिम रेल्वेने सौराष्ट्र -कच्छमधील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक रोखली असून जवळपास 69 गाड्या रद्द केल्या आहेत. गुजरातमध्ये जुनागढ, कच्छ, जामनगर, पोरबंदर, द्वारका, गिर सोमनाथ, मोरबी आणि राजकोट या परिसरातील 20 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी रवाना करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
ठाणे, पालघरसह मुंबईत वादळी वाऱ्यांची शक्यता
मागील दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई येथे जोरदार वारे वाहत होते. तसेच मंगळवारी नवी मुंबई व ठाणे परिसरात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी देखील नवी मुंबईत सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पूर्वमोसमी पाऊस असून, तसेच बिपरजॉयचा मिश्र परिणाम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवण्याची शक्यता असल्याने येथीलही एनडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात आहेत.
अलर्ट जारी
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही राज्यांतील किनारपट्टीवरील भागात बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तर गुजरातमधील सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रातही उंच लाटा उसळल्या होत्या.
50 कर्मचाऱ्यांना वाचवले
भारतीय तटरक्षक दलाने देवभूमी द्वारका येथील समुद्रात ऑयल रिंगमध्ये अडकलेल्या 50 कर्मचाऱ्यांची सुटका केली. हे कर्मचारी सिंगापूर येथील ‘ऑयल ड्रिलिंग शिप कीचे होते.