फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी खोल दाब क्षेत्रात रूपांतरित झाले असून, यामुळे बुधवारी त्याचे ‘दाना’ या चक्रीवादळात रूपांतर होणार आसल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 24 ऑक्टोबरला सकाळी हे चक्रीवादळ उत्तर बंगालच्या उपसागरात पोहोचेल आणि 24 ऑक्टोबरच्या रात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील पुरी आणि पश्चिम बंगालच्या सागर दीपपुंज परिसरात किनारा पार करेल.
ओडिशा मध्ये शाळा-कॉलेज बंद
यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दाना चक्रीवादळाच्या धोक्यामुळे ओडिशा सरकारने शाळा आणि महाविद्यालये 26 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ओडिशाच्या किनारी भागात 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशाला जाणार होत्या. मात्र, दाना चक्रीवादळामुळे यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यात अलर्ट जारी
ओडिशाच्या महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन दिलेल्या माहितीनुसार, 17 ओडीआरएएफ टीम्स किनारी जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पर्यटकांना पुरीला न जाण्याचा आणि 24-25 ऑक्टोबर रोजी शहर रिकामे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भुवनेश्वर हवामान विभागाच्या संचालक मनोरमा महापात्रा यांनी सांगितले की, बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय होईल, ज्यामुळे ओडिशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हावडा-पुरी मार्गावरून जाणाऱ्या गाड्या रद्द
तसेच या दाना चक्रीवादळाचा परिणाम झारखंड आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही होईल असे सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हावडा-पुरी मार्गावरून जाणाऱ्या 178 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानीसह इतर अनेक गाड्यांचा समावेश आहे. इंडियन कोस्ट गार्डने तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात केली असून, मच्छीमार आणि खलाशांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.
हे देखील वाचा- इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार