फोटो सौजन्य- Pinterest
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती आज दि. ११ जुलै रोजी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. पाठदुखीच्या तक्रारीनंतर ते दुपारी ३ वाजता एम्समध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे न्यूरो सर्जन डॉ. अमोल रहेजा यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे एम्सने एका निवेदनात म्हटले आहे.
राजनाथ सिंह यांनी कालच साजरा केला होता ७३ वा वाढदिवस
राजनाथ सिंह यांनी काल १० जुलै रोजी त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. यावर त्यांनी प्रत्युत्तरही दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आता एम्सनेही एक निवेदन जारी केले आहे
दिल्ली एम्सने एका निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पाठदुखीच्या तक्रारीनंतर आज जुन्या खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.
राजनाथ सिंह यांची राजकीय कारकीर्द
राजनाथ सिंह हे देशाच्या राजकारणात भाजपमधील ‘अजातशत्रू’ नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांचे सर्व पक्षातील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. वयाच्या १३ व्या वर्षी राजनाथ सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. आणिबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला होता.१९७७ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. २००० साली ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. दोन वेळा त्यांनी भाजपाचे अध्यक्षपद भूषविले. ज्यावेळी २०१४ साली देशात भाजपाचे सरकार आले त्यावेळीही राजनाथ सिंह हेच पक्षाचे अध्यक्ष होते. २०१४ ते २०१९ ते देशाचे गृहमंत्री होते आणि २०१९ पासून ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.