थंडीचा जोर वाढला! दिल्लीत तापमान 5 अंशांच्या खाली, महाराष्ट्रात हवामानाची काय स्थिती? (फोटो सौजन्य-X)
Weather Update News In Marathi: उत्तर भारतात जोरदार थंडीची लाट असून त्यामुळे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही जोरदार गारवा जाणवत आहे. महाराष्ट्रातील जळगावसह उत्तर महाराष्ट्रात याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. बुधवारी (11 डिसेंबर) दिल्लीच्या तापमानात झपाट्याने घट झाली. दिल्लीचे तापमान ४.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून दिल्लीतील तापमान सामान्यपेक्षा 5 अंश सेल्सिअसने कमी नोंदवले गेले, जे या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. एक दिवसापूर्वी दिल्लीचे तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. दिल्लीच्या हवामानाबाबत अपडेट देताना हवामान खात्याने झपाट्याने घसरणाऱ्या तापमानाचे कारणही स्पष्ट केले आहे.
बुधवारी दिल्लीत हंगामातील सर्वात थंड दिवसाची नोंद झाल्यानंतर हवामान खात्यानेही याचे कारण दिले आहे. दिल्लीतील वाढत्या थंडीचे सर्वात मोठे कारण बर्फाच्छादित पर्वतांवरून येणारे वारे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय दिल्ली आणि परिसरात निरभ्र आकाशामुळे तापमानात घट झाली आहे.
दिल्लीच्या घसरत्या तापमानाची माहिती देताना हवामान खात्याने सांगितले की, गेल्या डिसेंबरमध्ये किमान तापमान 4.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. विभागाने सांगितले की, 15 डिसेंबर 2023 रोजी त्या वर्षीच्या डिसेंबरमधील सर्वात थंड दिवसाची नोंद झाली. डिसेंबर 2022 मध्ये हे तापमान 5 अंश सेल्सिअस आणि 20 डिसेंबर 2021 मध्ये 3.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच दिल्लीत डिसेंबरमध्ये 1930 मध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. त्याच वर्षी 27 डिसेंबर रोजी दिल्लीचे तापमान शून्य अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सतत उत्तर-पश्चिमेकडून थंड वारे वाहत आहेत. या काळात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उंचावरील डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. यादरम्यान बर्फाच्छादित पर्वतांवरून येणारे वारे दिल्लीला हादरवून सोडत आहेत.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रात थंडीमुळे गारठा वाढला असून जळगाव, धुळे,नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. अंदाजे तीन ते चार अंश सेल्सियसने येथे तापमान घटले असून सरासरी पारा आठ ते नऊ अंशावर पोहचला आहे. आता या थंडीचा आठवडाभर जोर राहणार असून साधारणत:18 डिसेंबर थंडीचा जोर कायम राहिल तर मध्य महाराष्ट्रातही तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचदरम्यान धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी निचांकी 5.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजही जिल्ह्यात कड्याच्या थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. रात्री पासून थंड वाऱ्यामुळे बोचरी थंडी जाणवत असल्याने अनेक जण शेकोटीचा आसरा घेतांना दिसत आहेत. काल 4 डिग्री तापमान नोंदवले गेले होते. आज थोडी वाढ झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.