संग्रहित फोटो
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४ वर्षे, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खर्डे यांना १४ ते २७ फेब्रुवारच्या कालावधीत मोबाईल क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीने व्हाॅटसअप द्वारे व्हिडिओ कॉल केला. संबंधिताने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली.
तसेच भीती व मानसिक दबाव निर्माण करून फिर्यादी यांना त्यांच्या बँकेतील एफडी तोडण्यास भाग पाडले. तसेच वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून ३४ लाख ६० हजार व नंतर ११ लाख असे मिळून एकूण पंचेचाळीस लाख साठ हजार रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केली. नंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.
कोणताही व्यक्ती स्वतःला पोलीस, सीबीआय, इडी, न्यायालय किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फोन/ व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट” किंवा अटक होईल अशी भीती दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारे भीती दाखवून पैसे मागितल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. शक्य तितक्या लवकर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. – श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस निरीक्षक.






