नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर, दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत शनिवारी रात्री भूकंपाने (Earthquake) हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी नोंदवली गेली. रात्री 9 वाजून 34 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. अफगाणिस्तानच्या हिंदूकूश पर्वत (Hindukush) रांगेत या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समोर आले. पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच दिल्लीसोबत जम्मू- काश्मीर, चंदीगढ आणि मोहालीतही भूकंपाचा धक्का बसला. सुमारे 15 मिनीटांपर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवत होते.
भूकंपाच्या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अद्याप कोणतीही जीवत अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दिल्लीला मोठ्या भूकंपाचा झटका बसू शकतो, अशी शक्यता गेल्या काही वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. दिल्ली भूकंपाच्या झोनमधील चौथ्या झोनमध्ये येते. दिल्ली हिमालयाच्या जवळ आहे आणि भारत आणि युरेशिया या टेक्टॉनिक प्लेट एकत्र आल्याने त्याची निर्मिती झाली होती. या भागात काही हालचाली झाल्या तर त्याचा पहिला धक्का दिल्ली, कानपूर आणि लखनौ या भागाला बसतो.
जीवितहानी किंवा वित्तहानी नाही
सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची किंवा इतर नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपाची तीव्रता जास्त होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानच्या हिंदूकुश येथे भूकंपाचे केंद्र असल्यामुळे भारतासह पाकिस्तानतही धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे भूकंपाची घटना ही पहिली नाही. याआधी देखील वारंवार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.