अहमदाबाद अपघात क्रॅशमध्ये मृत्यू झालेले विजय रुपाणी यांचा मृतदेह सापडला (फोटो - सोशल मीडिया)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये विमानातील एक प्रवासी सोडून सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर क्रू मेंबर्स आणि विमान कोसळलेल्या वसतिगृहातील डॉक्टरांचा देखील यामध्ये मृत्यू झाला. यामध्ये आता मृतांचा आकडा 275 झाला असून यामुळे देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताच्या तीन दिवसांनंतर रुपाणी यांचा मृतदेह सापडला आहे.
या विमान अपघातामध्ये भीषण आग लागल्यामुळे प्रवाशांचे मृतदेह ओळखू येत नव्हते. यानंतर नातेवाईकांना बोलावून डीएनए टेस्ट केली जात आहे. रविवारी सकाळपर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. यापैकी 31 डीएनए जुळले आहेत. त्यापैकी 20 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यांचे मृत्युपत्रही उपलब्ध करून देण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रुग्णवाहिकांच्या मदतीने मृतदेह त्यांच्या गावी सुरक्षितपणे पोहोचवले जात आहेत. यासाठी 230 पथके तयार करण्यात आली आहेत, जी मृतांच्या कुटुंबियांशी थेट संपर्कात आहेत. 192 रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 11 परदेशी नागरिकांचे कुटुंब आज अहमदाबादला पोहोचू शकतात. यामध्ये आता गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृतदेह मिळाला आहे. त्यांचा डीएनए मॅच झाला आहे. त्यांचे पार्थिव लवकरच कुटुंबियांना सोपवले जाईल. विजय रुपाणी यांच्यावर राजकोटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
३१ डीएनए जुळाले
सरकारी बी जे मेडिकल कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक पटेल म्हणाले की, आतापर्यंत ३१ डीएनए नमुने जुळले आहेत आणि १२ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. हे लोक उदयपूर, वडोदरा, खेडा, मेहसाणा, अहमदाबाद आणि बोटाड जिल्ह्यातील होते. पीडित कुटुंबांशी समन्वय साधण्यासाठी २३० पथके तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. लंडनला जाणाऱ्या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचाही समावेश होता.
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामकडे जात असलेल्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत पायलटसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण ६ प्रवासी होते. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असतांना गौरीकुंड आणि त्रियुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. अपघातानंतर रेस्क्यू पथक ताडाईने घटनांसाठी पोहोचले. बचावकार्य त्यांनी सुरु केले आहे. गौरीकुंड- सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे आणि हवामान खराब झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. यवतमाळमधील वणी येथील हे कुटुंब आहे.