खासदार संजय राऊत यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत महायुतीवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व राहिलेला आहे. ते कायम ठेवण्यासाठी ठाकरे गट पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. ठाकरे गटाने मनसेसोबत युतीचा घाट घालण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी टायमिंग साधला. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये सध्या डोंबाऱ्याचा खेळ सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की. “दोघांत मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी. श्री. फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे काय? भाजपने कितीही मोठी बिल्डरांची लॉबी आणली तरी ठाकरे ब्रँडची तुलना करू शकत नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊतांनी टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे इतकेच,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “100% मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अपराजित आहे अजिंक्य आहे. राजकारण सोडून द्या लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीचा आदर आहे. महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जो संघर्ष केला आहे तो स्वाभिमानी महाराष्ट्र मराठी माणूस घडविला त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठी बिल्डरांची लॉबी आणली तरी या ब्रँडची तुलना करू शकत नाही आणि हे सत्य आहे. विधानसभा निवडणूक आपण लांड्या लबाड्या करून जिंकलात महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण तेच तयारी करतात पण या वेळेला जनता अत्यंत सावध आहे. तुम्हाला येणारा काळ दाखवून देईल काय करायचं,” असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस व महायुतीला दिला आहे.