अहमदाबाद – गुजरात विधानसभेच्या (Gujarat Election) १८२ जागांसाठी मतमोजणी (Vote Counting) सुरू आहे. आतापर्यंत भाजप (BJP) १३८ जागांवर, तर काँग्रेस (Congress) ३३ जागांवर आघाडीवर असून आम आदमी पार्टी (AAP) ८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या रिवाबा जडेजा यांनी जामनगरमधून पुन्हा आघाडी घेतली आहे. तसेच, अहमदाबादमधून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आघाडीवर असून विरमगाममधून भाजपचे हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत.
गुजरातमध्ये सकाळी ८ वाजता पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यानंतर इव्हीएमवरून मतमोजणी सुरू झाली. यावेळी राज्यात दोन्ही टप्प्यांत ६४.३ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेच्या ६९.२ टक्केपेक्षा हे जवळपास ५ टक्के कमी आहे. गेल्या पाचपैकी तीन निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला असून मतांची टक्केवारी घसरल्याने काँग्रेसला फायदा झाला आहे. तथापि, २०१२ च्या निवडणुकीत मतदानात १३ टक्के वाढ होऊनही भाजपने दोन जागा गमावल्या होत्या.
विरमगाममध्ये हार्दिक पटेल हे आपचे अमरसिंह ठाकोर यांच्यापेक्षा मागे आहेत. मोरबीमध्ये भाजपचे कांतीलाल अमृतिया आघाडीवर आहेत. मोरबी पुलाच्या दुर्घटनेत लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी मच्छू नदीत उडी मारली होती. जिल्ह्यातील मोरबी, टंकारा आणि वांकानेर या तीनही जागांवर भाजप आघाडीवर आहे. राज्याचे शिक्षणमंत्री जितू वाघानी भावनगर (पश्चिम) येथून पिछाडीवर आहेत. खंभालिया मतदारसंघात आपचे मुख्यमंत्री उमेदवार इशुदान गढवी यांनी आघाडी घेतली आहे.