कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
मुंबई : मागील पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढला होता. यामुळे हजारो रुग्णांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर आता कोरोनाचा नवा व्हेरियंट आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा वेगाने पसरत असल्याची माहिती दिली जात आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच सिंगापूरमध्ये 14 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी केईएम रुग्णालयात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर मुंबईभरात 53 रुग्ण असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केल्यामुळे पालिका सतर्क झाली आहे.
भारतातही 94 रुग्ण नोंदले गेले आहेत. नव्या संसर्गामुळे चीन, हाँगकाँगसह अनेक देश सतर्क झाले आहेत. यावेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट जेएन 1 आणि त्याचे उपप्रकार जेएफ7 आणि एनबी 1.8 मुळे संसर्ग झाल्याचे दिसते. सिंगापूरमध्ये सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. एप्रिलच्या शेवटी 11 हजार असलेली रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच 28 टक्क्यांनी वाढून 14 हजारांवर गेली आहे. दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढत आहे.
दरम्यान, रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. तरीही हा नवा प्रकार यापूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा घातक असल्याचे एकही उदाहरण आढळून आलेले नाही. मे महिन्यात आतापर्यंत भारतात केवळ 93 प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला हे सांगणे कठीण आहे.
कोरोनाची मोठी लाट नाही
सध्या भारतात कोरोनाची कोणतीही मोठी लाट आलेली नाही, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. मात्र, आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आपण आवश्यक व योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरणाचा सल्लाही देण्यात आला आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा
महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सोय आणि मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय रुग्णालये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसह सज्ज ठेवण्यात आली आहेत.
कस्तुरबा रुग्णालयात 112 बेड तयार
रुग्णसंख्या वाढल्यास सुविधेसाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स आणि चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात 112 बेड तयार करण्यात आले आहेत. तर लक्षणे असल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, स्वतःला इतरांपासून दूर ठेवा अशी नियमावलीच पालिकेने आज जाहीर केली आहे.