अटारी बॉर्डवर पाकिस्तानचा आडमुटेपणा, गेट उघडण्यास नकार, दोन्ही बाजूला अनेक लोक अडकले
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अटारी सीमेवर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पाकिस्तानकडून सकाळपासून गेट उघडण्यात आलेले नाहीत. पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांना देखील परत घेण्यास तयार नाही आणि भारतीय नागरिकांना देखील भारतात परत येण्याची अनुमती दिली जात नाही, त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jammu Kashmir Industry : काश्मिरात कंपन्या तिप्पट वाढल्या, 370 हटवल्यानंतर तेजी, पहलगाममुळे धक्का
भारतीय इमिग्रेशन काउंटरवर अधिकारी पाकिस्तानकडून गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. अटारी सीमेवर सकाळपासून आलेले पाकिस्तानी नागरिक अजूनही वाहनांमध्ये पाकिस्तानच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पाकिस्तानकडून गेट उघडल्यानंतर बीएसएफकडून दस्तऐवजांची तपासणी होईल आणि त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर इमिग्रेशन तपासणी होऊन ते त्यांच्या देशात परत जाऊ शकतील. सकाळपासून एकाही पाकिस्तानी नागरिकाने अद्याप सीमारेषा ओलांडलेली नाही.
#WATCH | Visuals from the Attari Integrated checkpost in Punjab’s Amritsar, where several Pakistani citizens have arrived to cross the border pic.twitter.com/X44zqxAfVf
— ANI (@ANI) May 1, 2025
अटारी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या निर्णयानंतर भारत सरकारने १ मे रोजी पाकिस्तानी नागरिकांना मोठा दिलासा दिला. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, १ मे पासून अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरील सर्व प्रकारची हालचाल व व्यापार पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले गेले असले, तरी भारतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी सध्या सीमेवरून जाण्याची मुभा दिली जाईल. पुढील आदेश येईपर्यंत भारतात असलेले आणि वैध ट्रॅव्हल व्हिसा, आवश्यक दस्तऐवज असलेले पाकिस्तानी नागरिक जे कोणत्यातरी कारणाने भारतात अडकले आहेत, त्यांना अटारी सीमेवरून पाकिस्तानात परतण्याची परवानगी दिली जाईल.
यापूर्वी भारत सरकारने १ मे रोजी अटारी सीमेवरील सर्व प्रकारची नागरी हालचाल व व्यापार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता पाकिस्तानी नागरिकांना भारत सरकारने मोठा दिलासा दिला आहे.