भारतीय हवाई दलाचं विमान मध्य प्रदेशमध्ये कोसळलं; संपूर्ण विमान जळून खाक
भारतीय हवाई दलाचं मिराज २००० विमान आज मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एका शेतात कोसळलं. विमान पूर्ण जळून खाक असून विमानातील दोन्ही पायलट बचावले आहेत. दरम्यान विमान अपघातामागील कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही.
भारतीय हवाई दलाने यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. “आज नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान शिवपुरी (ग्वाल्हेर) जवळ भारतीय हवाई दलाचं मिराज २००० विमान कोसळलं. सिस्टममध्ये बिघाड झाल्याने दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.”
Indian Air Force tweets, “A Mirage 2000 aircraft of the IAF crashed near Shivpuri (Gwalior), during a routine training sortie today, after encountering a system malfunction. Both the pilots ejected safely. An enquiry has been ordered by the IAF to ascertain the cause of the… https://t.co/gg4dfyuOK0
— ANI (@ANI) February 6, 2025
गुरुवारी दुपारी २.२० वाजता हवाई दलाचे मिराज २००० लढाऊ विमान मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या करायरा तालुक्यात कोसळलं. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाने नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातचं ते कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश हवाई दलाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त मिराज २००० विमानाचे वैमानिक जखमी झाले आहेत पण ते सुरक्षित आहेत. हे लढाऊ विमान ट्विन सीटर होते. विमान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी एक पथक पाठवले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान कोसळल्यानंतर ते पूर्णपणे जळून खाक झालं आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळील एका शेतात हे लढाऊ विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. धूर दिसताच गावातील लोक घटनास्थळाकडे धावू लागले. काही वेळातच गावकऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी जमली. त्यांनी अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकांना बाजूला घेत त्यांना सावरले.
संरक्षणविषयक स्थायी समितीने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात हवाई दलाशी संबंधित विमान अपघातांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. १३ व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत (२०१७-२०२२) हवाई दलाच्या ३४ विमानांचे अपघात झाले आहेत. अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, २०१७-१८ मध्ये, भारतीय हवाई दलाच्या आठ विमानांचे अपघात झालेत. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ११ अपघात झाले. याबाबत एका वृत्त वाहिनीने वृत्त दिलं आहे.