'निवडणूक आयोगाचा अंत झालाय', समाजवादी पक्षाने आयोगाला पाठवलं कफन; अखिलेश यादव म्हणाले...
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ७० जागांसाठी बुधवारी मतदान झालं. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. गुरुवारी मिल्कीपूरमध्ये मतदान केल्यानंतर अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोग मृतावस्थेत गेलं आहे आणि या मृतावस्थेत असलेल्या निवडणूक आयोगावर कफन चढवावं लागेल अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान आज निवडणूक आयोग लिहिलेलं पांढरं कापड पकडून समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी काढलेले फोटो पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
अखिलेश यादव म्हणाले, ही भाजपची निवडणूक लढवण्याची पद्धत आहे. निवडणूक आयोग मेलेलं आहे. त्यामुळे आयोगाला पांढरं कापड भेट कारवं लागेल. खरं तर, मिल्कीपूरमध्ये बनावट मतदान आणि मतदान एजंटला बूथवरून काढून टाकल्याचा आरोप सपा करत आहे. याबाबत ५ नेत्यांच्या शिष्टमंडळाने लखनऊमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष श्यामलाल पाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
यापूर्वी, अखिलेश यादव यांनी भाजपवर लोकशाही प्रक्रिया कमकुवत करण्याचा आणि पोटनिवडणुकांमध्ये हेराफेरी करण्याचा आरोप केला होता. त्यांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणीही केली होती.मिल्कीपूरमध्ये बेईमानी करण्यासाठी भाजपने सर्व प्रकारच्या युक्त्या वापरल्याचा आरोप सपा प्रमुखांनी केला. मिल्कीपूर पोटनिवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपने अराजकता निर्माण केली. त्याला पोलिस आणि प्रशासनाकडून खुले संरक्षण मिळाले. भाजपला मोकळीक देऊन पोलिस-प्रशासनाने निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन केले.
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांनी स्वतः काही लोकांना बनावट मतदान करताना पकडले. ते म्हणाले, रायपट्टी अमानीगंजमध्ये बनावट मतदानाबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीने हे स्पष्ट केले आहे की भाजप सरकारमधील अधिकारी हेराफेरीत कसे सहभागी आहेत. निवडणूक आयोगाला आणखी कोणते पुरावे हवे आहेत?
या आरोपांना उत्तर देताना, भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे की, मिल्कीपूर मतदारसंघात पक्षाच्या खराब कामगिरीनंतर अखिलेश यादव प्रचाराचे राजकारण करत आहेत. भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, मिल्कीपूरमधील पराभवानंतर निराश होऊन समाजवादी पक्ष खोटा प्रचार करत आहे. अखिलेश यादव हे प्रचार राजकारणाचे चॅम्पियन बनले आहेत, जे बनावट ऑडिओ, व्हिडिओ आणि चित्रांद्वारे आपल्या पराभवासाठी इतरांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ते म्हणाले की, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री पराभवासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना (ईव्हीएम) जबाबदार धरतील, जसे की मागील निवडणुकांमध्ये अनेकदा घडले आहे. भाजपने हेराफेरीचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि मिल्कीपूर पोटनिवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे म्हटले.
मिल्कीपूर पोटनिवडणूक ही समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. ही जागा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अयोध्या जिल्ह्याचा भाग आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी ही जागा सोडल्याने ही पोटनिवडणूक आवश्यक झाली. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर ही एकमेव विधानसभा जागा होती जिथे भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीत सपा जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, भाजप फैजाबादमधील पराभवाचा बदला घेण्याची ही संधी म्हणून पाहते.