नवी दिल्ली : भूकंपामुळे तुर्कस्तानमध्ये (Turkey Earthquake) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भारतीय सैन्याची मेडिकल टीम (Indian Army Medical Team) तिथे लोकांच्या मदतीसाठी गेली होती. भारतीयांनी केलेली ही मदत पाहून तुर्कस्तानातील लोकांनी त्यांचं कौतुक केलं. जेव्हा ही टीम भारतात परतत होती तेव्हा तुर्कस्तानमधील लोक भावूक (Turkey People Gets Emotional) झाले. त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव होता आणि डोळ्यातले अश्रू तर थांबतच नव्हते.
भारताची 99 सदस्यांच्या टीमने तुर्कीमध्ये (तुर्कस्तान) हेते प्रांतातील इस्केंदेरूनमध्ये सगळ्या उपकरणांसह 30 बेड्सचं फिल्ड हॉस्पिटल (Field Hospital) उभारलं. या हॉस्पिटलमध्ये लोकांवर चांगले उपचार करण्यात आले. ही टीम आता भारतात परत आली आहे. एखाद्या नेत्याप्रमाणे या टीमचं जंगी स्वागत करण्यात आलं. या टीममधील काही लोकांनी आपला तुर्कस्तानमधला अनुभव सांगितला.
भाषेची अडचण असतानाही तुर्कस्तानच्या लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही भारतात परत येत होतो तेव्हा तुर्कस्तानमधले लोक रडत होते. आमच्यासाठीही तो खूप भावनिक क्षण होता. आमचे आभार मानत त्यांनी आम्हाला मिठी मारली. हा एक वेगळा आणि ह्रदयस्पर्शी अनुभव होता.” त्यांनी सांगितलं की. “ आम्ही तुर्कीमधली भूकंपानंतरची जी परिस्थिती पाहिली ती खूप त्रासदायक होती. भूकंपाच्या झटक्यांमुळे सगळीकडेच सगळं उध्वस्त झालं होतं.”
भूकंप पीडितांची मदत
साठ पॅरा फिल्ड हॉस्पिटलच्या टीमने 7-19फेब्रुवारीदरम्यान तुर्कस्तानमध्ये भूकंप पीडितांची मदत केली. भारतीय आर्मीचे प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी सांगितलं की, तुर्कस्तानमध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीने केलेल्या कामाचा त्यांना अभिमान वाटतो. खूप कमी वेळात फिल्ड हॉस्पिटल तयार केलेल्या टीमचं कौशल्य काय आहे हे जाणवलं आहे.
ऑपरेशन दोस्त
भाषिक अडचणीबाबत सांगायचं तर या भारतीय टीमसोबत एक दुभाषी होता. त्यांनी पुढे सांगितलं की, साधारणपणे 3600 लोकांवर फिल्ड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अनेक छोट्या आणि मोठ्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. वेळीच वेगाने हालचाली करत फिल्ड हॉस्पिटल उभारल्याने तातडीची मदत करणाऱ्या तुर्कस्तानात आलेल्या सुरुवातीच्या टीममध्ये भारताच्या टीमचा समावेश होता.भारनाने तुर्की आणि सीरियामधली भूकंपग्रस्त भागात मदत करण्यासाठी ‘ऑपरेशन दोस्त’ ही मोहीम राबवली. भारतीय सैन्याच्या टीमचं तुर्कस्तानच्या नागरिकांनी कौतुक केलं.