भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीमध्ये तयार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेयर केला व्हिडिओ!

अहमदाबादच्या साबरमतीमध्ये भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन तयार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  अहमदाबाद : देशात अनेक दिवसापासुन ज्याची चर्चा सुरु आहे ते भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन (India First Bullet Train Station) अखेर तयार झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी गुरुवारी अहमदाबादमधील साबरमतीच्या मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलच्या व्हिडिओचे अनावरण केले. अश्विनी वैष्णव यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बुलेट ट्रेन स्टेशनच्या बांधकामादरम्यान सांस्कृतिक वारश्यासह आधुनिक वास्तुकलाची विशेष काळजी घेण्यात आल्याचं दिसत आहे.

  साबरमतीमध्ये बांधण्यात आलयं स्टेशन

  देशातील पहिलं पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीत बांधण्यात आलं आहे. या स्टेशनवर  प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. यासाठी जपानची मदतीने घेण्यात आली आहे. आर्थिक मदतीसोबतच जपानकडून तांत्रिक मदतही मिळत आहे. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. आनंदाची बाब म्हणजे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास बुलेट ट्रेनने अवघ्या 2.07 तासांत पूर्ण केला जाऊ शकतो. ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किमी असेल.

  508 किमी लांब अहमदाबाद-मुंबई बुलेट रेल्वेमार्ग

  अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात 508 किमी लांबीचा रेल्वेमार्ग टाकला जात आहे. ही दुहेरी रेषा बोगदा आणि समुद्राच्या खाली जाते. या प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. प्रकल्प खर्चाच्या 81% वार्षिक 0.1% दराने जपानी सॉफ्ट लोनद्वारे वित्तपुरवठा केला जाईल. यात 15 वर्षांच्या वाढीव कालावधीसह 50 वर्षांचा परतफेड कालावधी असेल.

  2017 मध्ये प्रकल्पाचा झाला शुभारंभ

  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2017 मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. शिंकनसेन टेक्नॉलॉजीच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ते तयार केले जात आहे. आणखी सहा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे कॉरिडॉर दिल्ली-वाराणसी, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-नागपूर, मुंबई-हैदराबाद, चेन्नई-म्हैसूर आणि दिल्ली-अमृतसर आहेत. या बुलेट ट्रेन बाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.