Iran-Israel War: इराणने मागितली भारताकडे मदत; एस. जयशंकर आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा
US-Israel Iran War : इराण आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युद्धाचा आजचा १४ वा दिवस असून अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये तणाव शिगेला पोहचला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारताकडे मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात फोनवरून सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर उच्चस्तरीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
एस. जयशंकर आणि अराघची यांनी आज (13 मार्च) फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांबाबतची नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली. तसेच इराणला स्वतःच्या सुरक्षेसाठी बदला घेण्याचा अधिकार आहे. अराघची यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना इराणवरील लष्करी हल्ल्यांचा निषेध करण्याचे आवाहनही केले.
अराघची यांनी सांगितले की, ब्रिक्ससारखे व्यासपीठ सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांनी प्रदेश आणि जगात स्थिरता आणि सुरक्षा राखण्यात रचनात्मक भूमिका बजावली पाहिजे. अराघची यांच्या भूमिकेवर बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, भारत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यास तयार आहे. इराणमधील शाश्वत शांतता आणि स्थिरता ही सर्व देशांची सामान्य गरज असल्याचे वर्णन केले.
मध्य पूर्वेतील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या काही दिवसांत इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी तब्बल तीन वेळा चर्चा केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत प्रामुख्याने काही महत्त्वाच्या विषयांवर भर देण्यात आला. यामध्ये युद्धाच्या स्थितीत भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यावर चर्चा झाली. व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. तसेच, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार केवळ राजनैतिक पातळीवरच नाही, तर जमिनीवरही मदत कार्य राबवत आहे. इराणमधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना अझरबैजान आणि आर्मेनिया मार्गे येण्यासाठी व्हिसा मिळवून दिला जात आहे. जमिनीवरील सीमा ओलांडून सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी भारतीय दूतावास सक्रिय मदत करत आहे. प्रवक्ते जयस्वाल म्हणाले की, सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
इराणमध्ये किती भारतीय आहेत?
युद्धाच्या परिस्थिती सध्या ९,००० भारतीय नागरिक इराणमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, खलाशी, व्यापारी, व्यावसायिक आणि काही यात्रेकरूंचा समावेश आहे.






