(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता कुणाल केम्मूने अलीकडेच दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या वर्क शिफ्टच्या मागणीबाबत आता अभिनेत्याने आपले मत मांडले आहे. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कुणाल केम्मू म्हणाला की, महिलांनी आपल्या प्रेग्नन्सीचं “योग्य नियोजन” करायला हवं. तसेच अधिक मानधन मिळवण्यासोबतच कमी तास काम करण्याची अपेक्षा कोणालाही ठेवता येत नाही, असेही अभिनेत्याने म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आणि नेटकऱ्यांनी आता संताप व्यक्त केला आहे.
निर्माते झाल्यानंतर निर्णय घ्या
सोहा अली खानशी संवाद साधताना कुणाल केम्मू म्हणाला, “तुम्ही स्वतः निर्माता बना, स्वतःचे पैसे गुंतवा, तेव्हा तुम्हीच बॉस असाल. त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला फक्त दोन तास काम करायचं आहे की नाही. मात्र दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणे खूप सोपे असते.” कुणाल केम्मू पुढे म्हणाला, “महिलांकडे एक पर्याय असतो. प्रेग्नन्सीचा सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी असतो, त्यामुळे त्याची आधीच योजना करता येते. तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच तुम्ही त्यासाठी नियोजन केलेले असते. मात्र तुमच्या नियोजनामुळे जग कसे काम करते त्यावर परिणाम होऊ नये.”
सोशल मीडिया नेटकऱ्यांचा संताप
दरम्यान, त्याच्या या वक्तव्यावर अनेक सोशल मीडिया युजर्सनी टीका केली आहे. काहींनी अभिनेत्याला स्त्रीविरोधी असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले, “सोहा अली खान आणि कुणाल खेमू” आम्हाला ‘कपल गोल्स’ वाटायचे, पण हे वक्तव्य स्त्रीविरोधात आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “आम्हाला वाटायचे की ते चांगले आहेत, पण त्यांच्या बोलण्यात महिलांविषयी द्वेष दिसतो आहे.” तर आणखी एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, “कुणाल नेहमीच मला अपरिपक्व वाटायचे; यावेळी मात्र ते खरे असल्याचे जाणवले.”
नक्की काय म्हणाली दीपिका?
तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण कधीही सार्वजनिकपणे असे सांगितले नाही की त्या निर्मात्यांकडे आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी करत होत्या. मात्र काही अहवालांनुसार, याच मागणीमुळे अभिनेत्रीला ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की २’ या चित्रपटांमधून बाहेर करण्यात आल्याची चर्चा होती. दीपिकाच्या मते, “आपण जास्त वेळ काम करणे ही सामान्य गोष्ट मानू लागलो आहोत. पण माणसाच्या शरीर आणि मनासाठी दिवसाला आठ तास काम करणे पुरेसे असते.”






