'स्पायवेअरचा वापर चुकीचा नाही, पण...'; पेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
सर्वोच्च न्यायालयात आज पेगासस स्पायवेअरशी संबंधित याचिकांवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणावर सविस्तर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. देशात स्पायवेअर असणं चुकीचे नाही, पण त्याचा गैरवापर झाला असेल तर त्याकडे लक्ष दिलं जाईल, असं न्यायालयाने म्हटल आहे.
पेगासस स्पायवेअरप्रकरणी दाखल याचिकांची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के.सिंग यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना, त्यांना शंका असलेल्या व्यक्तींची नावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांनी त्यांच्या उपकरणांमध्ये इस्रायली सॉफ्टवेअर वापरल्याची शंका आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जर देशाच्या सुरक्षेसाठी स्पायवेअरचा वापर होत असेल, तर त्यात काहीही चूक नाही. स्पायवेअरचा अस्तित्व असण्यात काही अडचण नाही, परंतु त्याचा वापर कोणाविरुद्ध होत आहे हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
न्यायालय म्हणाले की, स्पायवेअरचा वापर समाजातील एखाद्या व्यक्तीविरोधात होत असेल, तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल. वैयक्तिक शंका निवडणे शक्य आहे, पण तांत्रिक समितीच्या अहवालाला सार्वजनिक चर्चेचे दस्तऐवज बनवता येणार नाही.सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, दहशतवाद्यांना गोपनीयतेचा अधिकार असत नाही, असा युक्तीवाद केला.
नेमके काय आहे प्रकरण?
पेगासस स्पायवेअर हे एक अत्यंत शक्तिशाली आणि गोपनीयतेचा भंग करणारे सॉफ्टवेअर आहे, जे NSO Group नावाच्या इस्रायली सायबर कंपनीने विकसित केले आहे. याचा वापर सहसा सरकारे “राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव” करतात, परंतु अनेक प्रकरणांमध्ये त्याचा वापर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, राजकीय विरोधक आणि इतर नागरिकांविरुद्ध झाल्याचे आरोप आहेत.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये, नागरिकांच्या मोबाइल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर केला आहे. पत्रकार, न्यायाधीश, कार्यकर्ते आणि इतर अनेक लोक यांच्यावर जासूसी केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.