पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी कोण आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा
हिसार : हरियाणातील हिसार येथे राहणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी ही कारवाई केली असून, तिच्या विरुद्धच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. तपास यंत्रणांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात आयोजित इफ्तार पार्टीत सहभाग घेतल्याचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरून समोर आला होता. या व्हिडिओत ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना दिसते. विशेषतः पाकिस्तान दूतावासातील अहसान-उर-रहीम उर्फ ‘दानिश’ या अधिकाऱ्याशी तिच्या जवळीकांचा पुरावा या व्हिडिओमधून समोर आला आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा ठरला.
या प्रकरणात दानिशचे नाव पुढे आल्यानंतर भारत सरकारने त्याला १३ मे रोजी ‘अवांछित व्यक्ती’ घोषित करत देश सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर २४ तासांच्या आत त्याला पाकिस्तानात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२०२४ मध्ये ज्योतीने इफ्तार पार्टीचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाचे तिने खुलेपणाने कौतुक केले होते. त्यात ती आणि दानिश यांच्यातील ओळख व संवाद स्पष्टपणे दिसत होता. या नात्याच्या आधारे तपास यंत्रणांनी ज्योतीवर लक्ष केंद्रित केले. पाकिस्तानला जाण्याची तिची इच्छा व दानिशसोबतची जवळीक संशयास्पद मानण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा २०२३ मध्ये प्रथमच एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला गेली होती. यावेळीच तिची दानिशशी भेट झाली. भारतात परतल्यानंतरही ती त्याच्याशी संपर्कात राहिली. त्यानंतर ती दुसऱ्यांदा पाकिस्तानात गेली. या वेळी तिची ओळख अली अहसान या व्यक्तीशी झाली. पाकिस्तानात तिच्या राहण्याची व प्रवासाची जबाबदारी अलीने घेतली होती. त्यानेच तिला शकीर आणि राणा शाहबाज या पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटांशी सातत्याने संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांचा दावा आहे की तिने भारतीय लष्करी ठिकाणांची आणि कारवायांची माहिती शेअर केली होती. यामध्ये विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील माहितीचा समावेश होता. सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.