Photo Credit : Social Media
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. राज्यात 20 हजार 629 मतदान केंद्रे असतील. 150 मॉडेल बूथ असतील. 90 पैकी 73 जागा सर्वसाधारण असतील. SC साठी 17 जागा राखीव असतील.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, हरियाणात 2 कोटी 40 लाख मतदार आहेत. 27 ऑगस्ट रोजी हरियाणाच्या मतदार नियमाला अंतिम स्वरूप दिले जाईल. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 5 सप्टेंबरला जारी होणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 12 सप्टेंबर असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर असेल. मागील विधानसभा निवडणुकीशी तुलना केल्यास यावेळची निवडणूक खूपच रंजक ठरू शकते. सत्ताधारी पक्ष आपले यश आणि योजना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आहेत.
हेदेखील वाचा: हरियाणासह जम्मू-कश्मीरच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान
हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यात मतदान झाले. 21 ऑक्टोबर 2019 रोजी हरियाणा विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान झाले. तर, 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 68.20 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष म्हणून आलेल्या भारतीय जनता पक्षाला (भाजप) 36.7 टक्के मते मिळाली होती. 40 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 28.2 टक्के मतांसह काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने (JJP) 14.9 टक्के मतांसह 10 जागा जिंकल्या आणि हरियाणा लोकहित पक्षाने एक टक्क्यांपेक्षा कमी मतांसह एक जागा जिंकली. 2019 च्या निवडणुकीत सात अपक्षही विजयश्री मिळवून विधानसभेत पोहोचले होते. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा 46 जागा आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. पण अपक्षांच्या मदतीने बाजपने हरियाणात सत्ता स्थापन केली होती.
हेदेखील वाचा: हरियाणासह जम्मू-कश्मीर विधानसभेचा बिगूल वाजणार; निवडणूक आयोग करणार घोषणा