Uttarakhand Tunnel Rescue Operation

Uttarakhand Tunnel Rescue Operation : गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर काशी टनेलमध्ये अडकलेल्या मजूर उद्या सुटकेचा निश्वास घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व काही सुरळीत पार पडले तर, मजूर उद्याचा सूर्योद्य पाहू शकतील, अशी माहिती बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  Uttarkashi Tunnel Accident Rescue : आजुबाजूला काळाकुट्ट अंधार, डोक्यावर हेल्मेट आणि नजरेत प्रचंड भीती… उत्तरकाशीसह देशातील प्रत्येक जण 41 मजुरांच्या सुखरुप सुटकेसाठी प्रार्थना करतोय. गेल्या अकरा दिवसांपासून देश ज्यांच्या सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना करतोय. उत्तराखंडच्या उत्तकाशीतील बोगद्यात 41 मजूर सुटकेची वाट पाहत आहे. उत्तरकाशीमध्ये सिलक्यारा बोगद्यात हे सगळे मजूर 264 तासांपासून जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. आणि बाहेर शेकडो हात त्यांचा हाच संघर्ष यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, मजूर उद्याचा सूर्योद्य पाहू शकतील, अशी शक्यता आहे.
  लवकरच मजूरांची सुटका होणार
  बचाव अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, डोंगरावर बोगदा खणण्याचं काम वेगाने सुरु आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मजुरांची सुटका होण्याची शक्यता सर्व काही सुरळीत पार पडलं तर, मजूर उद्याचा सूर्योद्य पाहू शकतील, अशी माहिती बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुमारे 40 किमीपर्यंत बोगदा खोदला गेला आहे. आणखी 58 ते 60 किमीपर्यंत ड्रिलिंग होणरा आहे.
  11 दिवस मजूर बोगद्यामध्ये अडकलेले
  12 नोव्हेंबरला म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी उत्तरकाशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात 41 मजूर आपल्या नेहमीच्या कामासाठी पोहोचले. बोगद्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आल्याने बोगद्यात वीज आणि पाण्याची व्यवस्था होती. डोक्यावर हेल्मेट घालून प्रत्येकजण कामात मग्न होता आणि अचानक मोठा आवाज झाला. या आवाजासोबत मातीचा भला मोठा ढिगारा खाली आला आणि सगळे मजूर त्या ढिगाऱ्याच्या मागे अडकले.
  264 तास उलटल्यानंतरही बचावकार्य सुरुच
  पहिल्या दिवसापासून मजूरांशी संपर्क साधण्याचं प्रयत्न सुरू झाले, पण ही लढाई सोपी नव्हती. दोन दिवसांनंतर या मजूरांशी संपर्क साधून, त्यांच्यापर्यंत एक छोटी पाईपलाईन पोहोचवण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्या. या पाईपलाईनच्या माध्यमातून सुका मेवा, पाणी, औषधं मजूरांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. पण, मजूरांना बाहेर काढण्यासाठी मात्र अजूनही मार्ग सापडत नाहीय. मजूरांपर्यंत पोहोचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
  पहिला प्रयत्न
  पहिल्या दिवसापासून बोगद्याच्या मुख्य मार्गाने आत पोहचण्याचा प्रयत्न झाला. सिलक्याराच्या बाजूने ढिगाऱ्यातून पाईप आत टाकण्याचा प्रयत्न झाला. बोगद्यातील ढिगारा 60 मीटरचा आहे, 24 मीटरपर्यंत छेद केला गेला. पण, त्यानंतर एक मोठा दगडमध्ये आला.
  दुसरा प्रयत्न
  बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने ड्रील करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तिथेही मातीचा प्रचंड ढिगारा आहे.
  तिसरा प्रयत्न 
  बोगद्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने आत जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात कितपत यश मिळेल याची शाश्वती नाही.
  चौथा प्रयत्न
  हे सगळे प्रयत्न सुरू असतानाच डोंगरमाथ्यावरून छिद्र करून मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बरकोट येथून 6 इंचाचा बोगदा खोदण्याचा प्रयत्न सुरु आहे. हाच प्रयत्न सगळ्यांची मोठी आशा आहे. पण, डोंगराला छिद्र पाडण्याचं हे काम सगळ्याच बाजूंनी जोखमीचं आहे.
  याचं कारण, डोंगरमाथ्यापर्यंत मशीन्स नेण्यासाठी रस्ता नव्हता. युद्धपातळीवर काम सुरू झालं. परदेशी यंत्रणांचीही मदत घेतली गेली. अर्धा रस्ता तयार झाला आणि जमिनीला मोठे हादरे बसायला लागले. काम काही काळ थांबवावं लागलं. डोंगर माथ्यावरून छिद्र करत असताना आणखी ढिगारा खाली पडू नये आणि मजूरांना काही इजा होऊ नये याचीही प्रचंड काळजी घ्यावी लागेल.
  चारधाम प्रोजेक्ट अंतर्गत रस्ते तयार करण्याचं काम
  केंद्र सरकारच्या चारधाम प्रोजेक्ट अंतर्गत रस्ते तयार केले जात आहेत, त्यासाठीच या बोगद्याचं काम सुरू होतं. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा प्रकल्प आहे. ब्रम्हखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा आणि डंडलगांव यांच्या मधोमध या बोगद्याचं काम सुरू आहे. लष्करापासून ते एनडीआरएफपर्यंत जवळपास आठ यंत्रणा सध्या या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांना लवकर यश यावं अशी प्रार्थना ही दृष्य पाहणारा प्रत्येकजण करत आहे.