सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून, पाटण गावात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील सर्व दरडप्रवण गावांचे तातडीने भूगर्भीय सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे, तसेच अशा भागांमध्ये कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण गावातील शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांची पत्नी अनिता नंदकुमार तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोणे हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचारच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग त्यांच्या घरावर कोसळला. संततधार पावसामुळे डोंगराची माती खचून संपूर्ण घर माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, मातीचा प्रचंड ढिगारा असल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच स्थानिक स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
NDRFचे ३० जवान बचावकार्यात
दरडीखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवान असे ३० सदस्यांचे विशेष पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले.
कष्टाळू शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला
नंदकुमार तिकोणे हे परिसरातील कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते. शेतीच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता. पत्नी अनिता तिकोणे या देखील शेतीच्या कामात त्यांना साथ देत होत्या. तर मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली हा तरुण असून त्याच्या भविष्यासाठी कुटुंबाने अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, एका क्षणात संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले.
मावळात ‘माळीण’ची पुनरावृत्ती?
सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण गावात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेची आठवण या घटनेने पुन्हा ताजी झाली आहे. त्या दुर्घटनेनंतर दरडप्रवण भागांचे सर्वेक्षण, धोकादायक ठिकाणांची ओळख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पाटण गावातील दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“दरडप्रवण भागांची नियमित पाहणी, भूगर्भीय सर्वेक्षण आणि वेळेवर स्थलांतराची उपाययोजना झाली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या भागात दरडीचा धोका कायम असतानाही आवश्यक उपाययोजना न झाल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.






