छठ पूजेदरम्यान मोठी दुर्घटना; 11 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन तरुण
पटना : छठ पूजेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. बिहारमधील सात जिल्ह्यांमध्ये नहाय-खायच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला. पटना, जमुई, वैशाली, बांका, बेगुसराय, सीतामढी आणि कैमूर येथे विविध ठिकाणी लोक नदीत बुडाले. पटनाच्या खुसरुपूर पोलीस स्टेशन परिसरातील बंकटपूर-गोलिंदपूर घाटावर गंगा नदीत तीन तरुण बुडाले. हे तिघेही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती दिली जात आहे.
दुर्घटनेच्या दिवशी या कुटुंबाच्या घरी छठ पूजा सुरू असल्याची माहिती दिली जात आहे. या पूजेसाठी गंगेचे पाणी गोळा करून आणि घाट स्वच्छ केल्यानंतर स्नान करत असताना तिन्ही मुले पाण्याच्या प्रवाहात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच, एसडीआरएफ आणि स्थानिक गोताखोरांची टीम घटनास्थळी पोहोचली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
हेदेखील वाचा : छठ पूजेसाठी भारतीय रेल्वेची तयारी; तब्बल 12000 हून अधिक विशेष गाड्या धावणार, सुरक्षेसाठी…
त्याचप्रमाणे, वैशालीमध्ये एक व्यक्ती, जमुईमध्ये प्रसादासाठी पाणी भरण्यासाठी गेलेले दोन तरुण, बांका येथे चार लोक यातील एकाचा मृत्यू झाला आणि उर्वरितांना वाचवण्यात आले, बेगुसरायमध्ये एक तरुण, सीतामढीमध्ये तीन लोक यातील दोन मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरू आहे आणि कैमूरमध्ये १० वर्षांचा मुलगा बुडाला.
दरम्यान, चार दिवसांचा भव्य श्रद्धेचा उत्सव, छठ, न्हाय खयाने सुरू झाला आहे. छठ पूजेचा उत्सव शनिवारपासून सुरू झाला आणि चार दिवस साजरा केला जाणार आहे. याच काळात मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले.
मतदार थांबवून घेण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी एनडीए आणि महागठबंधन जोरदार तयारीला लागले आहे, त्याचबरोबर बिहारमध्ये सणाचा देखील मोठा उत्साह आहे. छठ पूजेसाठी लाखो स्थलांतरित बिहारी हे गावी परतत आहेत. या स्थलांतरित मतदारांना घरीच थांबवून त्यांचे मतदान पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे दोन टप्पे ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहेत, तर छठ २८ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यामुळे स्थलांतरित मतदारांना मतदानापर्यंत थांबवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.
छठ पूजेसाठी भारतीय रेल्वेची विशेष तयारी
दिवाळीच्या सणानिमित्त हजारो प्रवासी रेल्वे, बस असो वा विमान प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात. त्यातच आता छठ पूजेच्या निमित्ताने या दिवसांत गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते. छठ पूजा आणि इतर सणांमध्ये प्रवाशांची गर्दी हाताळण्यासाठी रेल्वे बोर्डाने विशेष तयारी केली आहे. त्यानुसार, तब्बल 12000 हून अधिक विशेष गाड्या धावणार आहेत. तर या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 900 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.






