Top Marathi News Today Live : अखेर पावसाचे दमदार आगमन झालंच; भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस
19 Jun 2026 10:20 AM (IST)
टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांच्या बजेट लाईनअपचा विस्तार करत Vivo Y6e 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 3 रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.
19 Jun 2026 10:10 AM (IST)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांपेक्षा लोकशाही आणि मतदारांच्या विश्वासाला महत्त्व देत त्यांनी सध्याच्या घडामोडींवर खंत व्यक्त केली आहे.
19 Jun 2026 10:00 AM (IST)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघणाऱ्या आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण पुणे जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. वारकरी संप्रदायाच्या या महान आध्यात्मिक सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
19 Jun 2026 09:50 AM (IST)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण तापले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
19 Jun 2026 09:40 AM (IST)
'ऑपरेशन टायगर'वरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'ऑपरेशन टायगर'वरून मोठा आरोप केला आहे. मराठवाड्यातील एका ठेकेदाराला उद्धव ठाकरे गट फोडण्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, हा विषय सध्या कायदेशीर गुंतागुंतीत अडकल्याने 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले.
19 Jun 2026 09:30 AM (IST)
नीरा बारामती रस्त्यावर पणदरे खिंड नजीक बारामती आगाराच्या बसला आग लागून बस जळून खाक झाली आहे. खामगळ पाटीच्या पुढे मयुरी हॉटेलजवळ ही घटना घडली. नीरा बाजूकडून ही बस बारामतीकडे जात असताना बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक धनंजय पवार दिसताच त्यांनी बस बाजूला घेत. आतमध्ये असलेल्या दोन प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले.
19 Jun 2026 09:20 AM (IST)
जागतिक सागरी व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन वेगवेगळ्या जलमार्गांवर सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण करारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसत असलेला ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’जवळील लष्करी तणाव शांत झाला आहे.
व्यापारी जहाजांसाठी हा मोठा दिलासा मानला जात असतानाच, जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या ‘पनामा कालव्याला’ (Panama Canal) आता एका मोठ्या नैसर्गिक संकटाने घेरले आहे. ‘एल निनो’ (El Niño) या हवामानाच्या चक्रामुळे पनामा कालवा परिसरात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून, यामुळे जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.
देशातील हवामान पुन्हा एकदा वेगाने बदलणार आहे. नवीन पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय नैऋत्य मान्सूनच्या एकत्रित प्रभावामुळे वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आसाम, मेघालय आणि सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वादळे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.






