इम्फाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मणिपूर पोलिस कमांडो ठार आणि तीन जवान जखमी झाल्याच्या काही तासांनंतर, अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी थौबल जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गोळीबारात बीएसएफचे तीन जवान जखमी झाले. या घटनेमुळे थौबलमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
बंडखोरांच्या गटाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन बीएसएफ जवानांपैकी दोन सहायक उपनिरीक्षक (एएसआय) सोबराम सिंग आणि रामजी आहेत. तिसऱ्याचे नाव कॉन्स्टेबल गौरव कुमार असे आहे. त्यांना इम्फाळ येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सशस्त्र कार्यकर्त्यांनी जमावाच्या आडून थौबल जिल्ह्यातील खंगाबोक येथील तिसऱ्या मणिपूर सशस्त्र बटालियनच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. सुरक्षा दलांनी किमान आवश्यक बळ वापरून त्यांना पांगवले. शिवाय, जमावाने थौबल पोलिस मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सुरक्षा दलांना बळाचा वापर करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले.
कांगपोकपी जिल्ह्यात दोन गटांत झालेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये वडील व मुलाचा समावेश आहे. परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात एकत्रित झाल्या व त्यांनी या घटनेविरोधात इम्फाळ शहरात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान व राजभवनपर्यंत रॅली काढून निषेध नोंदविला. या मोर्चाला राजभवनपासून 300 मीटर आधीच रोखण्यात आले होते.