पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात जून महिन्याच्या 'या' तारखेपासून मान्सून सक्रिय होणार (सौजन्य : iStock)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात भारतीय हवामान खात्याने यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हा मान्सूनचा पहिला अंदाज असून, पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जाणार आहे.
हवामान विभागाचा हा अंदाज शेती आणि अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आहे, कारण भारताच्या जीडीपीत कृषी क्षेत्राचे 18.2 टक्के योगदान आहे. सुमारे 42.3 टक्के लोकसंख्येसाठी शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. मान्सून खराब असेल तर पिकांचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे महागाई वाढू शकते. सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार, यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 105 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 87 सेमी असू शकतो.
1 जूनला केरळात आगमन
सर्वसाधारपणे 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर सात ते आठ दिवसांनी मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो. त्यानंतर, तो पुढे जातो आणि देशभर पसरतो. सप्टेंबरच्या मध्यात मान्सून माघारी परततो. यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अल निनो प्रभावहिन
मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, यावर्षी अल निनोची परिस्थिती निर्माण होणार नाही. स्कायमेटनेही या आधी मान्सूनबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये म्हटले की, अल निनो या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या अल निनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे.