NEET Exam
नवी दिल्ली : देशभरात NEET-PG प्रवेश परीक्षा आज (दि.23) घेण्यात येणार होती. मात्र, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहितीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच या परीक्षांबाबतच्या तारखांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक निवदेन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘काही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत. या घटनांची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्रालयाकडून प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मेडिकलसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून आयोजित एनईईटी-पीजी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला गेला. आता या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील’, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शनिवारी एनटीएच्या महासंचालकांना पदावरून हटवले होते. नेट आणि नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.