नवी दिल्ली : आज नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० परिषदेमुळे सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखी १०० गाड्यांवर त्यांचा परिणाम होणार आहे असे सांगण्यात आले आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तर काही गाड्यांचे सुटण्याचे स्थानक बदलण्यात आले आहे. त्याचबरोबर काही गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात येत आहे. अधिकृत सूचनेनुसार २०० हुन अधिक गाड्या रद्द झाल्यामुळे ३०० हुन अधिक गाड्यांवर प्रभाव पडणार आहे.
नवी दिल्लीमधील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ७ ते १० सप्टेंबर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. महाराष्ट्रामधून धावणाऱ्या गाडयांना देखील या बदलाचा फटका बसला आहे. २२१२५ नागपूर – अमृतसर एक्सप्रेस, १२९५१ मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली तेजस राजधानी, २२२०९ मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली, २०८०५ विशाखापट्टणम- नवी दिल्ली एपी एक्सप्रेस, ११०७८ जम्मू तवी- पुणे झेलम एक्सप्रेस, १२९२६ अमृतसर-मुंबई सेंट्रल पश्चिम एक्सप्रेस यांचा टर्मिनल बदलण्यात येणार आहे.
याचसंदर्भात दिल्ली पोलिसांनी आयोजनाआधी दिल्लीमध्ये रेल्वेने येणाऱ्या आणि दिल्लीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी प्रकाशित केली होती. ६ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३ च्या पहाटेपर्यंत बंदी राहणार आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण जगाचे लक्ष विशेषतः भारताचे लक्ष हे जी-२० कडे असणार आहे.