नवी दिल्ली – दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग यु-योंग यांनी काश्मीरबाबत दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईच्या सोशल मीडिया पोस्ट संदर्भात मंगळवारी फोनवरून भारताची माफी मागितली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील भारताच्या राजदूतानेही या प्रकरणी ह्युंदाई मुख्यालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
दरम्यान, हा वाद आता आणखीनच वाढला आहे. त्यात आता KFC, DOMINOS, Pizza Hut, Osaka Battery, Isuzu D-Max, Bosch Pharmaceuticals, Atlas Honda Limited आणि Kia Motors यांचा समावेश झाला आहे. या सर्व कंपन्यांच्या पाकिस्तानी सोशल मीडिया हँडलवरून ५ फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिनानिमित्त केलेल्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर त्यांच्या बहिष्काराची मागणी सुरू झाली आहे. या कंपन्यांनी आता माफीही मागायला सुरुवात केली आहे.
काय आहे प्रकरण?
ह्युंदाई पाकिस्तानने 5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानकडून कथित ‘काश्मीर एकता दिवस’ साजरा केला जात असताना ‘नो-पाकिस्तान’ असे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये पाकिस्तानचे समर्थन करण्यात आले. ट्विटमध्ये काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचाराचे वर्णन स्वातंत्र्याचा लढा असे करण्यात आले आहे. या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सनी ह्युंदाई मोटर्सला जोरदार ट्रोल केले. यानंतर हे वादग्रस्त ट्विट तात्काळ काढून टाकण्यात आले, परंतु त्याचे स्क्रीन शॉट्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिली माफी मागितल्याची माहिती
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, काश्मीर एकता दिनानिमित्त ह्युंदाई पाकिस्तानच्या पोस्टबद्दल माहिती मिळाल्यानंतर, सेऊलमधील आमच्या राजदूताने ह्युंदाई मुख्यालयाशी संपर्क साधला आणि या विषयावर स्पष्टीकरण मागितले. बागची म्हणाले की, पोस्ट काही वेळातच काढून टाकण्यात आली होती, पण तोपर्यंत ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
ते म्हणाले, या मुद्द्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोरियाच्या राजदूताला ७ फेब्रुवारीला बोलावले होते. Hyundai पाकिस्तानच्या सोशल मीडिया पोस्टवर भारताच्या तीव्र नाराजीची माहिती त्यांना देण्यात आली. यासोबतच कंपनीला या मुद्द्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते.






