केंद्र सरकार २४ रुपये दराने कांदा विकणार (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांदा विक्रीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये 24 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.
मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांमधील बफर स्टॉकमधून सुमारे 25 टन कांदे सहकारी संस्था नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार यांच्यामार्फत विकला जाईल. केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ज्या ठिकाणी कांद्याची किरकोळ किंमत 30 रुपयांपेक्षा जास्त आहे, तेथे 24 रुपये प्रति किलो दराने कांदे विकले जातील. अनुदानित कांद्याची विक्री शुक्रवारपासून चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता येथेही केली जाईल.
दरम्यान, ही कांदा विक्री डिसेंबरपर्यंत सुरू राहील. देशभरातील 574 केंद्रांवरून प्राप्त झालेल्या कांद्यासह 38 वस्तूंच्या दररोजच्या किमतींवर सरकार लक्ष ठेवून आहे. प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, जुलै 2025 मध्ये सामान्य किरकोळ महागाई 1.55 टक्के होती.
तीन लाख टन कांद्याचा बफर स्टॉक
गुरुवारी कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 28 रुपये प्रति किलो होती. तर काही शहरांमध्ये ती 30 रुपयांपेक्षा जास्त होती. सध्या सरकारकडे कांद्याचा तीन लाख टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. हा कांदा २०२४-२५ या आर्थिक वर्षात पीएसएफ (किंमत स्थिरीकरण निधी) योजनेअंतर्गत सरासरी 15 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करण्यात आला होता.
श्रीलंकेने वाढवले आयात शुल्क
इतर राज्यातील लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने सध्या नाशिकसह महाराष्ट्रातील कांद्याची मागणी घटली आहे. श्रीलंकेने आयात शुल्क वाढवले आहे. बांगलादेशमध्ये पूर्ण क्षमतेने निर्यात सुरू झालेली नाही. या एकंदर स्थितीत नाफेड आणि एनसीसीएफने नवी दिल्लीसह महानगरांमध्ये कांदा विक्री सुरू केल्याचा परिणाम स्थानिक दरावर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.