४६ उमेदवारांतून फक्त दोन शर्यतीत; उपराष्ट्रपतीपदासाठी चुरशीची लढत
Vice President Election 2025: देशात सध्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या चर्चांना जोर आला आहे. एकीकडे भाजप प्रणित एनडीए आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडीने आपापले उमेदवार उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवले आहेत. येत्या ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी नामांकन प्रक्रिया आणि छाननीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून आता फक्त दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. एक म्हणजे एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि दुसरे म्हणजे इंडिया ब्लॉकचे संयुक्त उमेदवार बी सुदर्शन रेड्डी.
मिळालेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण ४६ उमेदवारांनी ६८ नामांकन अर्ज दाखल केले होते, परंतु त्यापैकी मोठ्या संख्येने उमेदवार सुरुवातीच्या टप्प्यातच नाकारण्यात आले. प्रत्यक्षात, १९ उमेदवारांचे २८ नामांकन अर्ज तांत्रिक कारणास्तव स्वीकारले गेले नाहीत. उर्वरित २७ उमेदवारांच्या ४० नामांकन अर्जांची छाननी २२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. या काळात, निवडणुकीशी संबंधित नियमांनुसार अनेक नामांकन अर्ज अवैध घोषित करण्यात आले. त्यानंतर शेवटी फक्त दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेत सीपी राधाकृष्णन यांची नामांकन पत्र क्रमांक २६, २७, २८ आणि २९ स्वीकारण्यात आली आहेत. तसेच बुचिरेड्डी सुदर्शन रेड्डी यांची नामांकन पत्र क्रमांक ४१, ४२, ४३ आणि ४४ देखील स्वीकारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना आपले नामांकन मागे घेण्यासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत आहे. त्यानंतरच उपराष्ट्रपती पदासाठी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत निकालही जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीत फक्त खासदारच मतदान करणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व निवडून आलेले आणि नामांकित खासदार मतदानात करतात. हे मतदान गुप्त मतदान पद्धतीने केले जाते. खासदार त्यांच्या आवडत्या उमेदवाराला प्राधान्यक्रमाचे मत चिन्ह देतात.
Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
इतर उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानतंर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना होणार हे निश्चित झाले आहे. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पाठिंबा आहे. तर बी. रेड्डी इंडिया ब्लॉककडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. संख्याबळ पाहता एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, कोणाच्या बाजूने किती मते पडतात याचे स्पष्ट चित्र ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतरच दिसून येईल.