मुर्शिदाबादमध्ये जे घडलं ते अतिशय क्लेशदायक, TMC लोकांनी घरांनाही...', PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
“पश्चिम बंगाल सरकारने गुंडांना मोकळं रान दिलं आहे. पोलिस फक्त तमाशा पाहत आहेत. न्यायालयाला प्रत्येक प्रकरणात हस्तक्षेप करावा लागतो, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यांवर केला आहे. मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर ते बोलत होते. तसंच टीएमसी सरकारचा “निर्मम सरकार” असा उल्लेखही त्यांनी केला आहे.
नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे जनसभेला संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी पश्चिम बंगालच्या विकासाचं महत्त्व अधोरेखित करत “पश्चिम बंगालचा विकास म्हणजे भारताच्या उज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाया असल्याचं म्हटलं आहे.मोदींनी अलीपुरद्वार आणि कूचबिहार येथे सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रकल्पाचं उद्घाटन केलं. त्यांनी सांगितलं की या योजनेअंतर्गत २.५ लाखांहून अधिक घरांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणारी पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचवला जाईल. यामुळे सिलेंडरच्या त्रासातून महिलांची सुटका होईल आणि गॅस सुरक्षितपणे प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल.
पंतप्रधानांनी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत भारताच्या प्रतिकारशक्तीचं समर्थन केलं. “आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना सिंदूराच्या शक्तीचा प्रत्यय दिला. पाकिस्तानने ज्याची कल्पनाही केली नव्हती, असे दहशतीच्या ठिकाणांवर आमचा प्रतिहल्ला झाला,” असं ते म्हणाले.
मोदींनी ‘पूर्वोदय’ धोरणाचा उल्लेख करत सांगितलं की भाजप सरकारने गेल्या दशकात पश्चिम बंगालसाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांनी बंगालला पुन्हा ज्ञान-विज्ञानाचं केंद्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. “बंगाल ‘मेक इन इंडिया’चं मोठं केंद्र बनावं, आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत प्रगतीपथावर चालावं,” असं आवाहन त्यांनी केलं.
पंतप्रधानांनी शिक्षण क्षेत्रातील कथित घोटाळ्यांवरून टीएमसी सरकारवर हल्ला चढवला. “या घोटाळ्यांमुळे शेकडो शिक्षकांचे भविष्य अंधारात गेले आहे. गरिबांच्या हक्काची लूट झाली आहे,” असं ते म्हणाले. त्यांनी असंही आरोप केला की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी केंद्राच्या अनेक योजना राज्यात अंमलात आणल्या जात नाहीत आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभही लोकांपर्यंत पोहोचत नाही.
मोदींनी सांगितलं की २०१४ पूर्वी देशात केवळ १४ कोटी एलपीजी कनेक्शन होते, पण आज ही संख्या ३१ कोटींवर पोहोचली आहे. “घराघरात गॅस पोहोचवण्याचं स्वप्न आता वास्तवात उतरत आहे,” असं त्यांनी म्हटलं. एलपीजी वितरकांची संख्याही १४,००० वरून २५,००० वर गेल्याचं त्यांनी सांगितलं.
“ही भूमी केवळ सीमांनी नाही तर संस्कृतींनी जोडलेली आहे. एका बाजूला भूतानची सीमा, दुसऱ्या बाजूला असम, जलपाईगुडीचं सौंदर्य आणि कूचबिहारचा गौरव यांचं संगमस्थळ म्हणजे अलीपुरद्वार,” असं म्हणत त्यांनी या प्रदेशाच्या वैशिष्ट्याचं कौतुक केलं. ही सभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, जिथे नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये भाजपला मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.