Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण (Photo Credit- X)
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपती निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आणण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील संसद संकुलात भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत भाजप खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे शेवटच्या आसनावर बसलेले दिसले. आता याचीच चर्चा सुरु झाली आहे.
भाजपच्या या कार्यशाळेदरम्यान पंतप्रधान मोदींचे जीएसटी सुधारणांसाठी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यशाळेत पीयूष गोयल यांनी जीएसटी सुधारणांशी संबंधित आभारप्रदर्शन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर, खासदारांनी जीएसटी सुधारणांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला.
दरम्यान, खासदारांनी जीएसटी सुधारणांसाठी पंतप्रधानांचे आभारही व्यक्त केले. जीएसटीमधील सुधारणांमुळे लोकांवरील कराचा भार कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना आशा आहे की, या पावलामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार निवडणुकीत त्यांना फायदा होईल.
खासदारांची कार्यक्षमता वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा
या दोन दिवसांच्या कार्यशाळेत अनेक सत्रांचे आयोजन केले जात आहे. या सत्रांमध्ये पक्षाच्या इतिहास आणि विकासावरील चर्चेसोबतच खासदारांची कार्यक्षमता वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाईल.
प्रस्तावित एनडीए खासदारांचे जेवण रद्द
पंजाब आणि देशाच्या इतर भागात पुरामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर, 8 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) खासदारांसाठी आयोजित करण्यात येणारे जेवण रद्द करण्यात आले. तत्पूर्वी, शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी खासदारांसाठी आयोजित केलेले जेवण रद्द करण्यात आले.