पंतप्रधान मोदी बनले ‘थलायवा’; पोंगल स्पेशल लूक पाहिलात का?

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अनेकदा देशातील विविध पारंपारिक वेशभूषा करत सण समारंभामध्ये सामील होताना दिसत असतात. विविध प्रकारचे फेटे, शाली व अंगरखे घातलेले पंतप्रधान मोदी यांचे लूक चर्चेचा विषय ठरत असतात. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान मोदी यांचा लुंगी नेसलेला लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीतील राज्यमंत्री एल मुरुगन (State Minister L Murugan) यांच्या निवासस्थानी पोंगल उत्सव (Pongal festival) साजरा करताना नरेंद्र मोदी हे दाक्षिण भारतातील प्रसिद्ध अशा लुंगी लूकमध्ये झळकले आहेत.

    तमिळनाडूमध्ये पोंगल हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. दिल्लीतील राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी देखील या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पारंपारिक लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नरेंद्र मोदी यांनी काळ्या कोटसह पांढऱ्या रंगाची लुंगी नेसली आहे. तसेच डाव्या खांद्यावर नक्षीदार शाल घेतली आहे.

    नरेंद्र मोदी यांच्या या पोंगल स्पेशल लूकवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचा विधी करत असलेला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. समर्थकांनी पंतप्रधानांच्या सर्वसमावेशक वृत्तीचे कौतुक केले आहे.